महेश बाबूच्या वडिलांचे निधन : तेलुगू चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सुपरस्टार कृष्णा यांचे निधन, महेश बाबूवर शोककळा

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा पुन्हा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांनी रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता आज सकाळीच महेश बाबू यांच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी समोर आल्याने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.

काहीच महिन्यांपूर्वी महेश बाबूच्या आईचेही निधन झाले होते, त्यानंतर काहीच महिन्यात वडिलांचं जाणं हे महेश बाबूसाठी फारच धक्कादायक आहे.कृष्ण घट्टामनेनी हे एकेकाळचे तेलुगू चित्रपटसृष्टीतील खूप मोठे सुपरस्टार होते. 

त्यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान अतुलनीय असंच आहे.

कृष्णा यांनी छोट्या भूमिका साकारत आपल्या सिनेसृष्टीच्या करिअरची सुरुवात केली. १९६१ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 

१९६५ च्या ‘थेने मनसुलु’ या चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. त्यांनी त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक लोकांची मने जिंकली आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या स्टारचा दर्जा मिळवला.

५ दशकं चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या कृष्णा यांनी ३५० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. शिवाय त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचे कित्येक चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील कित्येक दिग्गज सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीदेखील याविषयी शोक व्यक्त केला आहे.